पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत टेनिस पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराज यांच्यात झाला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्यात ३७ वर्षीय नोवाक जोकोविचने ७-६, ७-६ असा विजय मिळविला. या विजयासह त्याने सर्बियाच्या खात्यात सुवर्णपदकाची भर टाकली. त्याचे हे ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक आहे. त्याच्या विजयामुळे स्पेनच्या अल्काराजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
तब्बल २ तास ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात युवा अल्काराजने शेवटपर्यंत मोठी झुंज दिली. पहिला सेट तब्बल ९४ मिनिटांचा झाला. दोन्ही सेटमध्ये टायब्रेकर झाला होता. मात्र, दोन्ही वेळा अनुभवी जोकोविचने टायब्रेकर जिंकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी जोकोविचने १६ वर्षांपूर्वी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले होते. त्याने २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली होती. जोकोविचने या सुवर्णपदकासह त्याच्या कारकिर्दीतील गोल्डन स्लॅमही पूर्ण केले. एकेरीत गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा तो केवळ पाचवा टेनिसपटू आहे. यापूर्वी स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, राफेल नदाल आणि सेरेना विलियम्स यांना असा पराक्रम करता आला.