27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रासह संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात!

महाराष्ट्रासह संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात!

ड्रग्जची काळी दुनिया, अंमली पदार्थांच्या तस्करीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल, अंडरवर्ल्डही सक्रीय

मुंबई : प्रतिनिधी
ड्रग्जची काळी दुनिया एवढी मोठी झाली आहे की, याची उलाढाल अरबो रुपयांत होत आहे. अमली पदार्थांची निर्मिती आणि तस्करीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डही सक्रिय झाले आहे. गोवा, हिमाचल प्रदेशची कुलू व्हॅली, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे ही शहरे आता ड्रग्ज रेव्ह पार्ट्यांसाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. बंगळुरू रेव्ह हॉटस्पॉट म्हणूनही उदयास आले आहे. ही बाब खरोखरच चिंताजनक बनली आहे.

जाणकारांच्या मते वर्षभरात जेवढी अमली पदार्थांची विक्री होत नाही, तेवढी विक्री डिसेंबर महिन्यात होते. यात उच्च प्रतीचे अमली पदार्थ चढ्या भावाने विकून अधिकाधिक नफा तस्कर कमावतात. त्यामागे मोठे अर्थचक्र असल्याने दरवर्षी अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अंमली पदार्थ खरेदी विक्री व्यवहार दिसतो, तितका सोपा नाही. बीटकॉईनवर हा व्यवहार होतो. ‘डार्क’ आणि ‘डिप’ अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो.

इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशीप घ्यावी लागते. बीटकॉईनवर ही मेंबरशीप मिळते. एक बीटकॉईन ५० लाख रुपयांचा झाला आहे. त्यात नुसते बीटकॉईन खरेदी करूनही मेंबर केले जाईल, याची कोणतीही खात्री नसते. जोपर्यंत तुम्ही अंमली पदार्थाच्या खरेदीसाठी मेंबर बनत आहात, याची खात्री पटत नाही. तोपर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतले जात नाही. त्यामुळे एखादा मोठा तस्करच परदेशातून अंमली पदार्थ मागवू शकतो. त्यामुळे त्यांना पकडणे अवघड झाले आहे.

देशातील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांपैकी एक असलेला इकबाल मिरची आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये २५ मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील १६ मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत. याशिवाय युकेमध्ये ४ कंपन्यांच्या नावावर ६ मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमध्ये ३ मालमत्ता आहेत.

मुंबईतही त्याची ५०० कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता होती. १४ ऑगस्ट २०१३ मध्ये मिरचीचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्­याने मृत्यू झाला. त्यावरून अंमली पदार्थ तस्करीचे जाळे मोठे असल्याचे निष्पन्न झाले. अंमली पदार्थांची उलाढाल १ लाख कोटींहून अधिक असल्याचे बोलले जाते. भारतातील बड्या तस्करांपैकी कैलास राजपूत, अली असगर सिराजी यांचेही परदेशी तस्करांसोबत संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते.

३ वर्षांत ५.५ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई वाढवली. त्यामुळे गेल्या ३ वर्षांत ५.५ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, सांगली, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने व राजस्थानमध्ये एक असे एकूण ८ मोठे कारखाने मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत.

सध्या मानवविरहित तस्करी
सध्या मानव विरहीत तस्करी केली जाते. त्यासाठी कुरिअर सेवा, डार्कनेट यांचा वापर केला जातो. याशिवाय परदेशातून अमलीपदार्थ भारतात आणण्यासाठी कंत्राटी पद्धतीचा वापर होते आहे. पैसे देऊन संबंधित व्यक्ती फक्त भारतात अंमली पदार्थ घेऊन येतो. त्याला या टोळीबद्दल अधिक माहिती नसल्याने मुख्य म्होरक्यापर्यंत पोहोचणे कठीण असते, असे अधिका-याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR