नगर : प्रतिनिधी
भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर राजकारण करणा-यांना फटकारले आहे. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात जो उद्रेक झाला आहे, त्यावर जिल्हा प्रशासनाची बारकाईने नजर आहे. गुन्हा देखील दाखल झाला आहे. परंतु त्याआडून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, सरला बेटावरील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानामुळे आणि नाशिक बंदमधील हिंसक प्रकाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तणावपूर्व शांतता आहे. राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, राजकीय नेत्यांमध्ये यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, समाजात वाद उद्भवेल, असे वक्तव्य टाळले पाहिजे, असे मंत्री विखे यांनी म्हटले. दरम्यान, रामगिरी महाराज यांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी अहमदनगर शहरात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात ४७ मुस्लिमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रामगिरी महाराज यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. त्यावर देखील मंत्री विखे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. ती राजकीय भेट नव्हती. मुख्यमंत्री शिंदे रामगिरी महाराजांनी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. गंगागिरी महाराजांची गादी पवित्र आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते, असे विखे यांनी सांगितले.