जिंतूर : महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, धनगर समाज आरक्षण संबंधात राज्यात लोकशाही मार्गाने आंदोलन चालू असून भाजप पक्ष हे पुर्वी पासुनच आरक्षण विरोधात आहे. राज्यात यंदा दुष्काळ असून देखील सरसकट दुष्काळ जाहीर झाला नाही. नौकर भरती न झाल्याने बेकारी, बेरोजगारी वाढली आहे. याशिवाय राज्यातील विविध समस्या भेडसावत असल्याचे मत युवा संघर्ष यात्रे निमित्ताने तालुक्यातील मालेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. रोहित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा पुणे ते नागपूर काढली आहे. या यात्रेत दुष्काळासह शेतक-यांच्या विविध समस्या, युवकांचे प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांसाठी अतिरिक्त घेण्यात आलेली फिस वसूल करण्यात यावी, राज्यातील उद्योग इतर राज्यात गेल्यामुळे बेरोजगारी वाढली असल्याने ते उद्योग परत आणावेत, जातनिहाय जनगणना करावी, माजी अधिका-यांनी दिलेल्या शेतकरी आत्महत्यांचा अहवाल राज्य सरकारने स्विकारुन तातडीने मदत करावी, महिला युवतींची प्रश्न अशा एकूण ३५ मुद्यावर युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे.
या निमित्त जवळपास ४०० किमीचा प्रवास करून यात्रा जिंतूर तालुक्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील मालेगाव येथे सकाळी ११ च्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आ.विजय भांबळे, रोहित पाटील, रमेश दरगड यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आ. रोहित पवार यांनी मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षण विषयावर केंद्रात राज्यातील खासदारांना बोलू दिले जात नाही. पूर्वी पासून भाजपाची आरक्षण विरोधी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचीच भाषा छगन भुजबळ बोलत असून ओबीसी विरुद्ध मराठा यांच्या वाद निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. आगामी हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दे लावून धरण्यासाठी ही संघर्ष यात्रा चालू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान मोठ्या प्रमाणात संघर्ष यात्रेत युवकांचा सहभाग दिसून आला. आज रात्रीचा मुक्काम तालुक्यातील शेवडी येथे होणार असून पुढील प्रवास हिंगोली जिल्ह्यातुन असणार आहे.
यावेळी माजी आ. भांबळे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आ. रोहित पवार यांच्या संघर्ष पदयात्रेचा ५० टक्के टप्पा जिंतूरात पुर्ण झाला आहे. या यात्रेत जिंतूर, सेलू विधानसभेसह सर्व राज्यातून नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या संघर्ष पदयात्रेत युवकांचे महत्वाचे प्रश्न, बेरोजगारी, ल नौकरी भरती, युपीएससी, एमपीएससीच्या रखडलेल्या परिक्षा, राज्यातील दुष्काळासह शेतक-यांचे विविध प्रश्न, मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम समाज आरक्षण तसेच भाजप सरकारच्या धोरणामुळे महागाईने कळस गाठल्याने जनसामान्यांचे हाल होत आहे. त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांनी या यात्रेला अभुतपुर्व प्रतिसाद दिला आहे. युवा नेते आ. रोहित पवार सर्वं जनतेच्या समस्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे माजी आ. भांबळे यांनी यावेळी सांगितले.