मुंबई : प्रतिनिधी
या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन मोठ्या आघाड्यांमध्ये जागांसाठी मंथन सुरू आहे. महायुतीमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत. परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २१ जागांवरून घोडे अडल्याचे बोलले जात आहे. या २१ जागा त्याच आहेत जिथे २०१९ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये बरोबरीची लढत बघायला मिळाली होती.
दरम्यान, कोण कोठून निवडणूक लढवणार, कोणाला तिकिट द्यायचे, हे प्रश्न आहेत. महायुतीबद्दल बोलायचे झाले तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत जागावाटपावरून वाद आहे. २१ जागांमध्ये बहुतांश जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि दोन्ही पक्ष या जागांवर दावा ठोकत आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटल्याचे दिसत आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे आणि गणेश हाके यांनी आपला मुद्दा मांडला होता. तर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी भाजपचा आवाज बुलंद केला. पाटील आणि घाटगे हे इंदापूर आणि कागल विधानसभेसाठी इच्छूक होते. या दोन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे पाटील पक्ष बदलू शकतात तर घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
शरद पवारांच्या अत्यंत जवळचे असलेले निंबाळकर हे अजित पवारांच्या सोबत आहेत. आता ते पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याची तयारी दाखवत आहेत. त्याचं कारण भाजप नेते, रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासह सोलापूर आणि सातारा इथल्या स्थानिक नित्यांसोबत त्यांचे सूर जुळत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीवर ते खुश नाहीत. सोलापूरचे अन्य दोन भाजप नेते उत्तमराव जानकर आणि प्रशांत परिचारक हेसुद्धा बदलत्या समीकरणांमुळे शरद पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.
शरद पवारांसोबत आणखी दोन नेते जाणार!
सोलापुरातील भाजपचे आणखी दोन नेते उत्तमराव जानकर आणि प्रशांत परिचारक हेही जिल्ह्यातील बदलती समीकरणे पाहता शरद पवार गटाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे विविध पातळ्यांवर एकमेकांविरुद्ध लढत आहेत.
राष्ट्रवादी ६०-६५ जागा लढवू शकते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ६० जागा मिळतील, असे बोलले जात आहे. दुसरीकडे अजित पवार गट ६० हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. याअंतर्गत अजित पवार गटाची नुकतीच बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाची ही बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली.