पनामा सिटी : वृत्तसंस्था
पनामाने ‘डंकी’ मार्गाने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १३० भारतीय प्रवासींना भारतात परत पाठवले आहे. या स्थलांतरितांनी पनामामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. जुलैमध्ये अमेरिकेसोबत झालेल्या करारानुसार ही कारवाई करण्यात आली.
या कराराअंतर्गत अमेरिकेने पनामामधील स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी ६ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे आपल्या दक्षिण सीमेवरील अवैध घुसखोरी कमी होईल, अशी अमेरिकेला आशा आहे. गेल्यावर्षी आलेल्या शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाने धोकादायक प्रवासाची दाहकता दाखवून दिली होती.
पनामाच्या अधिका-यांनी सांगितले की, या भारतीय स्थलांतरितांना विशेष विमानाने नवी दिल्लीला पाठवण्यात आले. अमेरिकेसोबतच्या या करारानुसार अमेरिकेबाहेरील कोणत्याही देशातील स्थलांतरितांना परत पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. कोलंबिया आणि पनामा दरम्यान वसलेले डॅरियन जंगल हे मध्य अमेरिका आणि मेक्सिको मार्गे दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत जाणा-या स्थलांतरितांसाठी एक प्रमुख मार्ग बनले आहे. हे जंगल अत्यंत धोकादायक आहे आणि त्यात गुन्हेगारी गटांचे वर्चस्व आहे, परंतु असे असूनही, गेल्या वर्षी अर्धा दशलक्षाहून अधिक स्थलांतरित हे जंगल पार करून अमेरिकेत पोहोचले.
या वर्षी अमेरिकेत निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत अमेरिका, पनामा आणि मेक्सिकोसारख्या देशांवर स्थलांतराचा हा मुद्दा गांभीर्याने घेण्याचा दबाव आहे. पनामाचे नवे अध्यक्ष जोस राऊल मुलिनो यांनी शपथ घेतली त्याच दिवशी हा करार झाला. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान डॅरियन जंगल ओलांडणा-या स्थलांतरितांवर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले होते.