जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथील कन्नड घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अंधार आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी कन्नड घाटातील दरीत कोसळली त्यामुळे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट येथून देवदर्शनावरून परतत असताना भाविकांची कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका परूषांचा समावेश आहे. तर ८ वर्षांच्या मुलीचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के, वय वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख ( वय ८) अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर, अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), सिधेस पुरुषोत्तम पवार, (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रूपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील रहिवासी अक्कलकोट येथे तवेरा गाडीने दर्शनासाठी गेले होते. यावेळी दर्शन घेऊन परत मालेगावकडे प्रवास करत होते. चाळीसगाव येथील कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात धुके तसेच अंधार होता. रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी कन्नड घाटातील दरीत कोसळली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.