मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना, शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर घेतले जाणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी ठाकरे गटाकडून विभागीय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे.
उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी नेते मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली आहे. आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी १० नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांची तयारी व महाराष्ट्रासह दिल्लीत ‘बदल’ घडविण्याची तयारी म्हणून जानेवारीत ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आयोजित केले आहे. याशिवाय जाहीर सभा व शिवसेना वइळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती दौ-यांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौ-याची आणि सभांबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.