28 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता

कोल्हापूर : प्रतिनिधी
संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. स्वराज्य संघटनेची आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ अशी नोंदणी झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी फेसबुक पोस्ट करत ही माहिती दिली.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याची फेसबुक पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टक-यांच्या साथीने स्थापन झालेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. स्वराज्य संघटना आजपासून‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरांत पोहोचली आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR