नवी दिल्ली : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्तरांवर संभाजीराजे हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी दिसून येत आहेत.
सोबतच, कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजेंना माहिती असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. आज (२८ नोव्हेंबर) रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहेत.