पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणात पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी मंगळवार दि. ८ ऑक्टोबर दुपारी बोपदेव घाटात घटनास्थळी भेट दिली. या वेळी पवार यांनी पोलिस तपासाबाबत माहिती घेतली.
बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन तरुणी मित्रासह फिरण्यास गेली होती. त्यावेळी अज्ञात तीन व्यक्तींनी दोघांना कोयत्याचा धाक दाखवून बांबूने मारहाण केली. त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटात घटनास्थळी भेट दिली. तसेच, या प्रकरणात सुरू असलेल्या पोलिस तपासाबाबत पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्याकडून माहिती घेतली.