मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कर्तज येथील शिबिरात अजित पवार यांनी बारामती लोकसभा लढवणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी लोकशाहीवर प्रेम करणारी नागरिक आहे. एखाद्या पक्षाला कुठून लढायचे आहे. हा त्यांना अधिकार आहे. बारामतीत लढण्याचे देखील अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करते. मात्र जनता ठरवेल कोण जिंकेल ते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार भाजपसोबत जाण्याची जी देवगिरीवर बैठक झाली. त्या बैठकीत सुप्रिया सुळे होत्या. त्यांच्या साक्षीने चर्चा झाली आणि त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली गेली होती. २ जुलै रोजी बैठक झाली होती, असा दावा अजित पवार यांनी केला. याबाबत सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, मी गेले होते. माझ्या भावाचे घर आहे मी जाऊ शकते. मात्र मी चर्चेत नव्हते. मी विचारले पण मला कुणीच काही सांगितले नाही. बेसिक चर्चा झाली होती. तुम्ही प्रस्ताव द्या, मी बाबांशी बोलते, असे मी त्यांना सांगितले होते. मात्र भाजपसोबत जाण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नव्हती.