नाशिक : प्रतिनिधी
मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचे बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
बाजार समितीच्या कार्यकाळात जास्तीत जास्त दिवस अनुपस्थित असल्याने तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी अद्वय हिरे यांच्याविरोधात निकाल दिला आहे. अद्वय हिरे यांचे बाजार समितीचे सभासदत्व रद्द होणे म्हणजे हा त्यांच्यासाठी मोठा धक्काच मानला जात आहे.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे हे बाजार समितीच्या एकूण ७ मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याचे सिध्द होत आहे. सदर बाबत महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २४ ची तरतूद प्रभावित होते, असे उपनिबंधकांनी निकालाच्या विश्लेषणात म्हटले आहे.
सदरचा गैरहजर असल्याचा कालावधी हा ३० दिवसांपेक्षा अधिक असून रजेच्या मंजुरी संदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) नियम, १९६७ चे नियम ९३ मधील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीचे अनुपालन झालेले नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अद्वय प्रशांत हिरे यांना महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २४ मधील तरतुदीनुसार मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे समिती सदस्यत्व रद्द करण्याबाबत खात्री झालेली असल्याने मी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे, असे उपनिबंधकांनी म्हटले आहे.