32.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeपरभणीसुर्यवंशी कुटुंबिय दोषी पोलिसांना कधीच माफ करणार नाही

सुर्यवंशी कुटुंबिय दोषी पोलिसांना कधीच माफ करणार नाही

.... तर तुम्ही माफ केले असते का ? सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा आ. धस यांना संतप्त सवाल

परभणी : प्रतिनिधी
नाशिक येथे लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत. याबाबत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केले असते का? असा संतप्त सवाल करत सुर्यवंशी कुटूंबिय दोषी पोलिसांना कधीच माफ करणार नसल्याचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत सर्व दोषी पोलिस अधिका-यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, सोमनाथच्या मारेक­-यांना माफ करा असे आ. सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? असे विचारत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केले असते का? असा संतप्त सवाल विजयबाई सुर्यवंशी व भाऊ अविनाश सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.

आ. धस हे गरीबांचे कैवारी म्हणून मिरवतात मात्र ते तर गुंडाचे कैवारी झाल्याचे दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या. जो पर्यंत सोमनाथ सर्यवंशी यांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचेही त्या म्हणाल्या. आ. धस यांनी मन मोठे करा आणि पोलिसांना माफ करा असे म्हटले असून त्याचा समाचार घेत विजयाबाई सुर्यवंशी म्हणाल्या की, आमचे मन छोटेच आहे, आम्ही गुन्हेगारांना अजिबात माफ करणार नाही. तुमचे चुकीचे बोलणे सहन करणार नाही.

माझ्या पोटचं लेकरू गेलंं आहे. माझं लेकरू परत आणून देऊ शकता का? मी कोण्या पोलिसाला माफ करणार नाही, त्यांना मोकळे सोडणार नसल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि सोमनाथचे मारेकरी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोदवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सुर्यवंशी कुटुंबियांनी केली.

यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांच्यासह सोमनाथचा भाऊ तसेच वंचित बुहजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता साळवे यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR