बीड : बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली असून, यामध्ये अटक केलेले आरोपी हे समाजकंटक आहेत. त्यामुळे ते कोणत्या समाजाचे आहेत याच्याशी पोलिसांचे काही संबंध नाही. आम्ही फक्त जाळपोळ आणि दगडफेक करणा-या लोकांना अटक करत आहोत. तसेच ते आमच्यासाठी फक्त आरोपी आहेत, अशी प्रतिक्रिया बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर बीड पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच जाळपोळीच्या घटनेत छगन भुजबळ यांचे समर्थक तथा समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला आग लावण्यात आली होती. त्यानंतर, काल छगन भुजबळ यांनी या हॉटेलची पाहणी केली.
मात्र, सुभाष राऊत यांच्या हॉटेलची जाळपोळ करणारे भुजबळ यांचेच नातेवाईक असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच, बीडच्या दौ-यावर असतांना भुजबळ यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मराठा समाजातील मुलांचे नावे देऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या आरोपानंतर बीड पोलिस अधीक्षकांची प्रतिक्रिया समोर येत आहे. ‘आम्ही कुठल्याही समाजाच्या तरुणांवर कारवाई करत नसून, आमच्यासाठी जाळपोळ आणि दगडफेक करणारे फक्त आरोपी असल्याचे पोलीस अधीक्षक ठाकूर म्हणाले आहेत.
काय म्हणाले जरांगे?
ओबीसी नेते पोलिसांवर दबाव आणून मराठा समाजातील तरुणांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. बीड पोलिसांनी घाबरायची गरज नाही. बीड पोलिसांच्यामागे मराठा समाज उभा आहे. जे दबाव तंत्र सुरू आहे, ते थांबल तर बरे होईल. अन्यथा जो निर्णय उशिरा घ्यायचा आहे तो आता घेऊ अशा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.