नागपूर : नागपूरच्या अवघ्या १७ वर्षीय हितेन धारपुरे याने आपली कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. हितेनने जगातील सर्वात लहान, पूर्णत: कार्यक्षम रोबोटिक आर्म विकसित करून यापूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
यापूर्वी जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्मचा विक्रम अमेरिकेतील इंडियाना येथील केल्टन सेरा यांच्या नावावर होता. त्यांनी विकसित केलेल्या ४४.४९ मिलिमीटर (१.७५ इंच) आकाराच्या ३ डी-प्रिंटेड रोबोटिक आर्मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता मिळाली होती. मात्र, हितेनने केवळ ३९.२५० मिलिमीटर आकाराचा पूर्णपणे कार्यक्षम रोबोटिक आर्म तयार करून हा विक्रम मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला.
हितेनने विकसित केलेला ही रोबोटिक आर्म अत्याधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीवर आधारित असून तो मानवी हाताप्रमाणे विविध हालचाली करू शकते. या आर्ममध्ये मायक्रो सर्वो मोटर्स आणि उच्च अचूकतेचे पीडब्ल्यूएम कंट्रोल मॉड्यूल वापरण्यात आले आहे. तीन स्वतंत्र अक्षांवर हालचाल करण्याची क्षमता असलेल्या या उपकरणाद्वारे अत्यंत लहान वस्तूही अचूकपणे पकडता येतात.
या प्रकल्पासाठी हितेनने एफडीएम तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत: कस्टम चेसिस डिझाइन केले आणि ३डी प्रिंटिंगद्वारे त्याची निर्मिती केली. अत्यंत मर्यादित जागेत सर्वो मोटर्स, इलेक्ट्रॉनिक घटक आणि वायरिंगचे अचूक नियोजन करणे हे या प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, सूक्ष्म नियोजन आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर त्याने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. आपल्या यशाबद्दल बोलताना हितेन धारपुरे म्हणाला की, सहज उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करूनही जागतिक दर्जाचे, उच्च अचूकतेचे रोबोटिक्स विकसित करता येतात, हे सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न होता. सूक्ष्म उत्पादन तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओलांडून नवकल्पना साकार करता येतात, हा संदेश या प्रकल्पातून द्यायचा होता. विकसित भारताच्या उभारणीत हे आपले छोटेसे योगदान असल्याचेही त्याने सांगितले.
















