28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणा-या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई होणार

ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणा-या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश

मुंबई : प्रतिनिधी
कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावताना परवानगी घेणे आवश्यक असून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ते दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलच्या मर्यादेतच ते सुरू ठेवता येतील. स्थानिक पोलिस निरीक्षकांवर यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. वेळ व आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

केंद्राच्या कायद्यातील तरतुदींमुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणा-या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रार्थनास्थळांवर भोंगे लावले जातात. यामुळे अनेकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होतो. सणावाराच्या दिवशी भोंगे लावले तर हरकत नाही. पण हे भोंगे दिवसातून पाच वेळा वाजत असतात.

आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस आयुक्तांनी पत्र पाठवूनही कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने सर्व राज्यातील भोंगे उतरविले होते. राज्य सरकारने तात्काळ उदयापासून या भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली. अतुल भातखळकर यांनी देखील यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की ध्वनी प्रदूषण करणा-यावर कारवाई करावी. या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यावर कठोर कारवाई करणार का ? आणि याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देणार का? असे प्रश्न उपस्थित केले.

कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावताना त्याची रितसर परवानगी घेतलीच पाहिजे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ते बंद असले पाहिजेत. तसेच सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलच्या मर्यादेतच सुरू ठेवता येतील. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत. त्यामुळे पोलिसांवर मर्यादा येतात. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास मंडळ कारवाई करेलच, पण परवानगी शिवाय परस्पर भोंगे लावले गेले असतील तर भोंगे जप्त करण्यात येतील.

तसेच त्यांना पुन्हा परवानगी मिळणार नाही. या सगळया अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाची(पीआय) असणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात हे डेसिबल मीटर असते. पोलिसांनी या मीटरचा वापर करून ध्वनीमर्यादा तपासली पाहिजे. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्यास पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. याबाबतची अंमलबजावणी ही संबंधित पीआयने करायची आहे. अंमलबजावणी न झाल्यास संबंधित पीआयला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या संदर्भातील कायदयाची कठोर अंमलबजावणी करायची झाल्यास सध्या तरी पोलिसांना फारसे अधिकार नाहीत. केंद्र सरकारला यासाठी नियमात आवश्यक सुधारणा करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना राऊतांचा आठवला भोंगा
या भोंग्यांवर तर कारवाई करूच पण सकाळच्या रोज ९ वाजता वाजणा-या भोंग्यावर कोण कारवाई करणार असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. संजय राउत यांचे नाव न घेता लगावला. तेव्हा एकच हशा उसळला.

विनापरवाना भोंग्यांवर कारवाई होणार
यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी न घेता लावलेल्या व नियमांचे उल्लंघन करणा-या भोंग्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR