छत्रपती संभाजीनगर/हिंगोली : हिंगोलीतील कळमनूरी तालुक्यामधील गंगापूर येथील पूरग्रस्त भागाची विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शुक्रवार दि. २२ ऑगस्ट रोजी पाहणी केली. शेतक-यांच्या हळद, केळी, सोयाबीन आणि ऊस पिकाचे सरसकट नुकसान झाले असून शासन आणि प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
पिक विम्याचे तीन निकष शासनाने रद्द केल्याने विमा अंतर्गत या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. शेतक-यांचे पिक शिल्लक राहिले नाही. बैलपोळा हा सण शेतक-यांचा उत्सवाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र शेतकरी राजाचे पिक वाया गेल्याने शेतक-यांच्या आनंदावर विर्जन पडले आहे. शासनाने शेतक-यांना नुकसान भरपाई घोषित करून शेतक-यांचा बैलपोळा सणाचा आनंद गोड करावा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केली. प्रशासनाला संबंधित प्रकरणाचा जाब विचारत आगामी काळात अशी हलगर्जीपणा होता कामा नये अशी सूचना अंबादास दानवे यांनी केली.
अस्मानी संकटाने पीकच शिल्लक नाही
शासनाने नुकसान झालेल्या भागाचा अभ्यास करावा. शेतक-यांचे पिक शिल्लक राहिले नाही. शेतक-यांवर या अतिवृष्टीमुळे मोठे अस्मानी संकट आले असल्याने संपूर्ण उत्पन्नच मातीत गेले आहे. यामुळे शेतकरी घेतलेले कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न उपस्थित करत शेतक-यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.
दानवेंनी घेतली पुरात अडकल्यांची भेट
पुरात अडकलेल्या लोकांची घेतली भेट हिंगोली जिल्ह्यातील गंगापूर येथे पुरात अडकेल्या ८ लोकांची अंबादास दानवे यांनी यावेळी भेट घेतली. या पुरात ४ दिवस हे नागरिक अडकले होते. वेळेवर आम्हाला रेस्क्यू आणि बचाव पथक पोहचले नाही. यामुळे ४ दिवस आम्ही अन्न पाण्याविना राहिलो असल्याची तक्रार या नागरिकांनी केली.
















