26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रसर्वांगीण विकास मोदींची गॅरंटी

सर्वांगीण विकास मोदींची गॅरंटी

मुंबई : प्रतिनिधी
शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मी दहा वर्षांपूर्वी कार्य सुरू केले होते. त्यावेळी महाराजांच्या साक्षीनेच देश बदलणार असल्याचे सांगितले होते. देशातील जनतेने १० वर्षांत स्वप्नांना प्रत्यक्षात येताना पाहिले आहे. जिथे इतरांची गॅरंटी संपते, तिथे मोदीची गॅरंटी सुरू होते. याच मोदी गॅरंटीच्या माध्यमातून मी आज सांगत आहे की येत्या काही वर्षांत मी देशातील २ कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ज्यांनी आधी देशावर अनेक वर्ष राज्य केले, त्यांच्याकडे विकासाचे धोरण नव्हते. आधी हजारो कोटींच्या घोटाळयांचीच चर्चा व्हायची. पण आज हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची चर्चा होत असल्याचे मोदींनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांच्या शिलान्यास तसेच भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर नवी मुंबई येथे आयोजित जनसभेस त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार असे म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारतासाठी ऐतिहासिक आहे. आज जगातील सर्वात मोठया समुद्रीसेतूंपैकी एक अशा अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपण समुद्राशीही टक्कर घेऊ शकतो, लाटांनाही तोंड देऊ शकतो हे आपण दाखवून दिले आहे.

२६ डिसेंबर २०१६ ला मीच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने देश बदलणारच, ही तेव्हा मोदीची गॅरंटी होती. आज मी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिद्धिविनायकाला प्रणाम करत हा अटल सेतू मुंबईकर व देशाला समर्पित करत आहे. लोकार्पणाचे कार्यक्रम लोकांना भुलविण्यासाठी नव्हे तर प्रत्येक प्रकल्प हा भारताच्या नवनिर्माणाचे माध्यम आहे. आज मुंबई व महाराष्ट्राच्या ३३ हजार कोटींच्या प्रकल्पाच्या शिलान्यास व लोकार्पण झाले आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजीपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या टीमचे हे यश आहे. जी गॅरंटी मोदीने दिली त्याला महाराष्ट्र सरकारदेखील पुढे नेत आहे, असे मोदी म्हणाले.

दहा वर्षापूर्वी हजारो कोटींच्या मेगास्कॅमची चर्चा व्हायची. आज हजारो कोटींच्या प्रकल्प पूर्णत्वाची चर्चा होते. पायाभूतसाठी पूर्वी १२ लाख कोटी बजेट होते, ते आम्ही ४४ लाख कोटींचे बजेट दिले. महाराष्ट्रात ८ लाख कोटींचे प्रोजेक्ट पूर्ण किंवा सुरू आहेत. राज्यात नवीन प्रोजेक्ट तयार होत आहेत. कोस्टल रोड, फ्री वे, मुंबईला पहिली बुलेट ट्रेनदेखील लवकरच मिळेल. दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर बनणार आहे. नवी मुंबई मेट्रो प्रोजेक्टदेखील आधीच्या सरकारमध्ये अडकला होता. पण डबल इंजिन सरकार आले आणि सुरू झाला.

२ कोटी महिलांना लखपती दिदी बनवू
डबल इंजिनचे सरकार कोणत्याही राज्यात असो महिला कल्याण ही आमची पहिली गॅरंटी आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्तीदूत अ‍ॅप्लीकेशन, लेक लाडकी योजना याचे उत्तम उदाहरण आहे. मोदी गॅरंटीच्या माध्यमातून मी आज सांगत आहे की, येत्या काही वर्षांत मी देशातील २ कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली.

अटल सेतू जनतेच्या आकांक्षांचा जयघोष
अटल सेतू हा जनतेच्या आकांक्षांचा जयघोष असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज मी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिदधीविनायकाला प्रणाम करत हा अटल सेतू मुंबईकर व देशाला समर्पित करत आहे. लोकार्पणाचे कार्यक्रम लोकांना भुलविण्यासाठी नव्हे तर प्रत्येक प्रकल्प हा भारताच्या नवनिर्माणाचे माध्यम आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

८ प्रकल्पांचा शुभारंभ
नवी मुंबईत आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील ८ प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये मुंबई-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचे उद्घाटन, ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह या दरम्यानच्या ९.२ किमी भूमिगत बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीकडून महत्त्वाकांक्षी मार्गाचे काम करण्यात येणार आहे. मुंबई व महाराष्ट्रातील ३३ हजार कोटींच्या ८ प्रकल्पांचा शिलान्यास व लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारचीही पाठ थोपटली.

आता ४०० पारला राज्याचा हातभार : शिंदे
अटल सेतू हा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल आहे. हा पूल २२ किमी मार्गाचा आहे. भूकंपाचे धक्केही हा पूल सहन करू शकतो. आता लोकसभा निवडणुकांत विरोधकांना भूकंपाचे झटके बसणार आहेत. अन्याय आणि अत्याचाराचा अंत करण्यासाठी प्रभू रामाच्या सेनेने समुद्र सेतू बांधला होता. हा सागरी सेतूही अहंकारी लोकांचा अहंकार मोडणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत मी म्हणेन फिर एक बार मोदी सरकार, महाराष्ट्रात ४५ पार हा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत, असे म्हटले.

५० वर्षांपूर्वीचे स्वप्न मोदींमुळे प्रत्यक्षात
१९७३ सली या सागरी सेतूची संकल्पना मांडण्यात आली होती. १९८२ मध्ये जेआरडी आणि टाटा यांच्या कमिटीने सेतूची मांडणी केली, पण पुढे ४० वर्ष काहीही झाले नाही. २०१४ नंतर देशाचा मिजाज बदलला. मोदीजींच्या सरकारने मर्यादित वेळेत आम्हाला सर्व पर्यावरण मंजुरी दिल्या, सर्व प्रकारच्या मान्यता दिल्या, मोदीराजमुळेच अटल सेतू होऊ शकला. जर मोदीराज नसते तर हा सेतू झालाच नसता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR