नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणानंतर आता गंगापूर धरणातूनही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. नदीला पूर येताच वाहनतळावर चारचाकी वाहने अडकली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी तसेच जीवरक्षक दलाच्या युवकांनी ही वाहने सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली.
गंगापूर धरणातून पाणी सोडणार असल्याने पाण्याची पातळी वाढणार असल्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने शनिवारीच दिल्या होत्या. मात्र, अशा सूचना दिल्या गेल्या नसल्याचे नागरिक सांगत आहेत. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने रविवारी दुपारी पाण्याची पातळी वाढली. पाणी म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, खंडोबा पटांगण व रोकडोबा मैदानावरून वाहू लागल्याने या ठिकाणच्या वाहन तळावर पार्क केलेली वाहने पाण्यात अडकली.
रामकुंडावर धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या भाविकांची तसेच बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची होती. वाहने पार्क करताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या नसल्याने त्यांची वाहने अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने रात्रीच परिसरातील व्यवसायिकांना सूचना देऊन टप-या काढून घेण्यास सांगितले होते. पाण्याची पातळी मर्यादित असल्याने वाहने वाहून जाण्याची शक्यता नव्हती. परंतु वाहने बाहेर काढणे अवघड होत होते. त्यामुळे अग्निशामक दलाची मदत घेऊन वाहने सुखरूप बाहेर काढण्यात आली.