27.1 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर जिंकण्यासाठी अमित शहा यांची रणनीती, नाराजांना फोन करून काढली समजूत

कोल्हापूर जिंकण्यासाठी अमित शहा यांची रणनीती, नाराजांना फोन करून काढली समजूत

कोल्हापूर : डॉ. राजेंद्र भस्मे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुक्रवारी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या जवाहर मैदानावर दुपारी तर सांगलीतील संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी विटा येथे महायुतीच्या प्रचारासाठी सभा झाल्या. तत्पूर्वी ते कोल्हापुरात एक दिवस अगोदरच (गुरुवारी) डेरेदाखल झाले. कोल्हापूर येथील एसटी स्टँडजवळील ‘हॉटेल पंचशील’ येथे यांचा मुक्काम होता. शुक्रवारी दुपारी त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि महायुतीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला. रत्नागिरी येथील सभेमध्ये त्यांनी आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले.

कोल्हापुरात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. तर, अमित शहा हे देखील महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी थेट नाराजांना फोन करत त्यांची समजूत काढली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांची मोठी फळी प्रचार यंत्रणेत सक्रिय झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय विद्यापीठ असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली असून गेल्या आठवडाभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून डझनभर नेत्यांनी वेगवेगळ्या भागात प्रचार केला. तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील कोल्हापूरमध्ये महायुती घटक पक्षाच्या नेते व पदाधिका-यांच्या खास बैठका घेऊन निवडून आणण्यासाठी वेगवेगळ्या जोडण्या लावल्या असून नाराज नेत्यांची फोनवर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अमित शहांकडून करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागा महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेत धुरळा उडवला तर आता काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात दाखल होत महायुती घटकपक्षांच्या नेते आणि पदाधिका-यांच्या खास बैठका घेऊन दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी जोडण्या लावल्या आहेत. गेल्या दहा वर्षांचे भाजपचे रिपोर्ट कार्ड पाहायला गेले तर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषत: कोल्हापुरात म्हणावी तशी मोट बांधता आलेली नाही. अशातच कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने आणि विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांच्यासारखे दिग्गज उमेदवार उभे असल्याने भाजपने कोल्हापूर, हातकणंगले या जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे.

विविध नेत्यांना भेटून मतदारसंघाचा आढावा घेतला तर आज सकाळी अमित शहा यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच शिवसेना व महायुतीचे प्रमुख पदाधिका-यांची उपस्थिती असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान, बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील नाराज नेत्यांसोबत थेट बैठकीमधूनच शहा यांनी फोनवरून संवाद साधला असल्याची माहिती आहे. तसेच, विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत चर्चा करण्यात आली असून दोन्ही जागांबाबत जिल्ह्यातील नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांना बैठकीतूनच शहा यांनी फोनवरून सूचना केल्या आहेत. तसेच कोल्हापूर, सांगली साखरपट्टा असल्याने केंद्राने साखर कारखानदारीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये साखर कारखानदारीतील नेते भाजपसोबत यावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेतेअमित शहांनी फिल्डिंग लावली असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR