37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeसोलापूरमाढ्यात मोदींनी मांडला केलेल्या कामांचा हिशोब

माढ्यात मोदींनी मांडला केलेल्या कामांचा हिशोब

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून महाराष्ट्र दौ-यावर आहेत. आज माळशिरस येथे भाजप उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ विविध मुद्द्यावर भाषण केले.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदींनी आज माळशिरस येथे माढ्याचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत मोदींनी त्यांनी देशभरात केलेल्या विविध कामांसह माढा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यात केंद्र सरकारने केलेल्या कामांचा हिशोब मांडला.

यावेळी पंतप्रधानांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच यावेळी मोदींनी मावळत्या सूर्याची शपथ या वाक्याचा उल्लेख केला. त्यानंतर पंतप्रधानांच्या या वाक्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

नरेंद्र मोदी यांनी या सभेत शरद पवार यांचे नाव न घेता २००९ मध्ये पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवल्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली.
१५ वर्षांपूर्वी एक खूप मोठे नेते इथे निवडणूक लढवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेत या दुष्काळी भागात पाणी पोहचवणार असे आश्वासन दिले होते. पण त्यांनी तुम्हा पाणी दिले का? असा प्रश्न उपस्थितांना विचारत त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.

मावळत्या सूर्याची शपथ
२००९ मध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघाची पूनर्रचना झाल्यानंतर माढा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारसंघात एक सभा सुरू असताना, सूर्य मावळत होता आणि त्यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. तेव्हा पवार यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेत या भागातील दुष्काळ संपवण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, २०१४ नंतर लोकसभा न लढवण्याचा निर्णय पवारांनी घेतला. त्यांनी माढ्याचे प्रतिनिधित्व करुन आता दहा वर्षे उलटली आहेत. तरीही विरोधक सातत्याने पवार यांच्या त्यावेळच्या ‘मावळत्या सूर्याची शपथ’ या वाक्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करत असतात.

दरम्यान माढा मतदारसंघातून २००९ मध्ये शरद पवार विजयी झाले होते. त्यानंतर राष्ट्रावदीकडूनच २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटलांनी मोदी लाट असतानाही विजय मिळवला होता. तर २०१९ मध्ये पवारांच्या उमेदवाराला पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हा आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार यांनी यंदा धैर्यशील मोहिते-पाटलांना मैदानात उतरवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR