नवी दिल्ली : दिल्ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य धोरण प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी चौकशी एजन्सीला पत्र लिहून चौकशीसाठी पाठवलेली नोटीस मागे घेण्याची मागणी केली. त्यांनी ही नोटीस ‘बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित’ असल्याचा दावा केला आहे. आता यावरून भाजपने त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाजपने म्हंटले की, अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे बादशहा आहेत. त्यामुळे ते ते तपासापासून पळत आहेत. त्यांना सत्याचा सामना करायचा नाही, असे भाजपने म्हटले आहे.
एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सपासून पळून गेले. त्यांना सत्याला सामोरे जावेसे वाटत नाही. दिल्लीच्या दारू घोटाळ्यातील ‘बादशहा’ने मद्य घोटाळा आणि भ्रष्टाचारात हात असल्याचे कबूल केले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पात्रा म्हणाले की, ईडी या प्रकरणाची चौकशी करेल. तथ्ये आणि पुरावे यांच्या आधारवर समन्स जारी केले पण केजरीवाल तपास यंत्रणेच्या प्रश्नांना तोंड देण्यापासून पळ काढत आहेत कारण त्यांना सत्य माहित आहे.