29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ताधारी गटाच्या कारखान्यांना तब्बल १२०० कोटींची खैरात

सत्ताधारी गटाच्या कारखान्यांना तब्बल १२०० कोटींची खैरात

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी गटातील साखर सम्राटांना शिंदे-फडणवीस सरकारने पेटारा उघडून खैरात केल्याचे समोर आले आहे. या सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतून उडी मारलेल्या आणि भाजपच्या गळाला लागलेल्या साखर सम्राटांच्या ११ कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच एनसीडीसीकडून एकूण ११८१.८१ कोटींची थकहमीच्या रुपात खैरात केली आहे. एकीकडे साखर कारखानदारांची अडवणूक आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील कारखानदारांना मागच्या दाराने सुरू असलेली मदत भूवया उंचावणारी आहे.

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठिराखे असलेल्या साखर सम्राटांनाही यातून मदत मिळाली आहे. दुसरीकडे सरकारकडून देण्यात आलेल्या थकहमीमध्ये अडचणीत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा मात्र यामध्ये समावेश नाही. त्यामुळे तोंड बघून थकहमीचा पेटारा खुला केला जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकशीचा ससेमीरा चुकवल्याने आपल्याला कशी शांत झोप लागते, हे जाहीरपणे सांगणारे माजी काँग्रेस नेते आणि आता भाजपवासी असलेले हर्षवर्धन पाटील हे याचे सर्वांत मोठे लाभार्थी ठरले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना, महात्मा फुलेनगर, इंदापूर कारखान्यास १५० कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याच मालकीच्या निरा भिमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर, रेडा, इंदापूर कारखान्यास ७५ कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांना २२५ कोटी रुपयांची थकहमी मिळाली आहे.

अशोक चव्हाणांनाही लाभ
आदर्श घोटाळ््यावरून अडचणीत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपची वाट धरली. भाजपमध्ये दाखल होताच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आणि त्यानंतर लगेचच त्यांच्याच मालकीच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना, लक्ष्मीनगर, नांदेड कारखान्यासाठी १४७.७९ कोटींची थकहमी देण्यात आली. यासोबतच धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, सोलापूर कारखान्याला १२६.३८ कोटी रूपयांची थकहमी देण्यात आली.

बँक रसातळाला जाईल : राजू शेट्टी
सरकारकडून सुरु असलेल्या खैरातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली. राज्य सहकारी बँक आता कोठे सावरत असतानाच अशा प्रकारे पतपुरवठा केल्यास बँक पुन्हा रसातळाला जाईल. या कर्जाची हमी सरकारने घेतली असल्याने बँकांना पैसे परत न केल्यास सरकारला भरावे लागतात, असे शेट्टी म्हणाले.

लुटण्यासाठी भाजपमध्ये गेले
चार-पाच महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हायकोर्टाच्या आदेशाने राज्य सहकारी बँकेकडे १ हजार कोटी भरले आहेत. हे सगळे बुडवे आहेत, म्हणून भाजपमध्ये गेले आहेत. थकहमी मिळालेले भाजप आणि मित्रपक्षातील नेते आहेत. राष्ट्रवादीतील टोळके लुटण्यासाठी भाजपमध्ये गेले आहे, असा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR