लखनौ : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सांगितले की, त्यांनी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे माजी आमदार विनय शंकर तिवारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडी ७५० कोटी रुपयांच्या कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. फेडरल एजन्सीने सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार उत्तर प्रदेशातील लखनौ, महाराजगंज आणि गोरखपूर जिल्ह्यात २७ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत.
ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या मालमत्ता माजी आमदार विनय तिवारी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या नावावर नोंदवण्यात आल्या आहेत. ते ‘गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेड’चे संचालक, प्रवर्तक आणि जामीनदार होते. तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ७२.०८ कोटी रुपये असल्याचे ईडीने म्हटले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोनेही (सीबीआय) या प्रकरणात गुन्हा दखल केला आहे. ईडी त्या एफआयआरच्या आधारे चौकशी करत आहे.
ईडीने आरोप केला आहे की, ‘गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेड’ने त्याचे प्रवर्तक, संचालक आणि जामीनदारांच्या संगनमताने बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील सात बँकांच्या संघाकडून १,१२९.४४ कोटी रुपयांचे कर्ज फसवेगिरीने मिळवले. ईडीने सांगितले की, कर्जाची परतफेड केली नाही आणि ‘गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेड’ आणि त्याचे प्रवर्तक, संचालक आणि जामीनदार यांनी मोठ्या प्रमाणावर बँकिंग नियमांचे उल्लंघन करून निधीची उधळपट्टी केली, ज्यामुळे बँकेचे ७५४.२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.