31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसोलापूरलहान वयात पाठांतर लवकर होते

लहान वयात पाठांतर लवकर होते

सोलापूर:- लहान वयातच मुलांनी विविध प्रकारचे श्लोक स्तोत्रे पाठ करावी. लहान वयातच पाठांतर लवकर होत असते आणि या वयात केलेले पाठांतर कायम स्मरणात राहते त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यकाळात चांगल्या प्रकारे होतो, असे प्रतिपादन वेदमूर्ती जयंत फडके यांनी केले.

दासनवमी निमित्ताने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरतर्फे शिशु लहान गट ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक, करुणाष्टके आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण बुधवारी संस्थेच्या सभागृहात वेदमूर्ती जयंत फडके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष दत्ता आराध्ये, विजय कुलकर्णी, महिला शाखा अध्यक्ष हेमाताई चिंचोलकर, युवक अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख सुशांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना फडके म्हणाले, संस्थेने लहान मुलांच्या पाठांतरास प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. लहान वयातील संस्कार कायमस्वरूपी राहत असतात. मुलेही अनुकरणप्रिय असतात त्यामुळे पालकांनी घरात रामरक्षा प्रज्ञावर्धिनी स्तोत्र दररोज ठराविक वेळी म्हणण्याची सवय लावून घेतली की मुले आपोआप अशा प्रकारची स्तोत्रे म्हणण्यास तयार होतात असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर येळेगावकर म्हणाले, स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या मुलांचे मी अभिनंदन करतो. स्पर्धेत बक्षीस मिळणे महत्त्वाचे नसून अशा स्पर्धेमधून आपल्याला लहानपणापासून व्यासपीठावरून बोलण्याची कला अंगी बाणली जाते. व्यासपीठावरून समोर बसलेल्या व्यक्तींसमोर आपल्याला बोलण्याचे धाडस अशा स्पर्धांमधून मिळते. आपण केलेला अभ्यास आपल्या किती लक्षात राहतो हेही या पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या आणि पालकांच्याही लक्षात येते. त्यामुळे मुलांनी सातत्याने वेगवेगळ्या पाठांतर स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

३ मार्च रोजी सरस्वती मंदिर येथे या स्पर्धा झाल्या होत्या. शिशु लहान गट ते इयत्ता चौथी पर्यंत अशा विविध सहा गटांमधून सुमारे १८५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. १२ परीक्षकांनी या परीक्षेचे परीक्षण केले होते. त्यातील सर्व परीक्षकांनी घेतलेल्या निर्णयानुसार ३१ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. सोलापूर शहरातील विविध शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन संस्थेच्या उपक्रमास बहुमोल साथ दिली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या यादी वाचनाचे काम सुशांत कुलकर्णी आणि शिरीष मंगरुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये यांनी केले. आभार कोषाध्यक्ष सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमास कार्यकारणी सदस्य शंकर कुलकर्णी, डॉ. नभा काकडे, शिरीष मंगरुळकर आदींची उपस्थिती होती.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR