40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयजोरबैठकांचे सत्र!

जोरबैठकांचे सत्र!

महाराष्ट्रातील सध्याची एकंदर राजकीय स्थिती पाहता महायुती असो की महाआघाडी, जागावाटप हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार, याचा सर्वांनाच पुरता अंदाज होताच. मात्र, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणास केंद्रीय पातळीवरील महाशक्तीचा थेट आशीर्वाद असल्याने शिंदे व अजित पवार भाजपसमोर फारशी ‘बार्गेनिंग पॉवर’ दाखवू शकणार नाहीत व भाजपश्रेष्ठींनी ठरवल्याप्रमाणे जागावाटप होईलच, असा दावाही जाणकार मंडळी करत होती. त्यादृष्टीने अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अपेक्षेप्रमाणे अमित शहा यांनी महायुतीचे लोकसभेसाठीचे जागावाटप भाजपने ठरवल्याप्रमाणेच होईल, याचे स्पष्ट संकेत दिले असले तरी तीन पक्षांच्या एकत्र येण्याने अनेक मतदारसंघांमध्ये जो गुंता निर्माण झाला आहे तो काही सुटला नाही. त्यामुळे हा गुंता सोडविण्यासाठी ब-याच जोरबैठका कराव्या लागणार हे स्पष्टच झाले आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने दिल्ली गाठावी लागली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनीही ९ मार्चला पक्षातील आपल्या सहका-यांसह दिल्लीत धडकण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनाही दिल्लीचे बोलावणे येईल अशी अपेक्षा आहे.

मात्र, ९ मार्चला तरी हा गुंता सुटणार का? याबाबत साशंकताच आहे. लोकसभेसाठी भाजपने ‘चारसौ पार’चे लक्ष्य निश्चित करताना स्वबळावर ३७० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे भाजपश्रेष्ठी शिंदे वा अजित पवारांचा जागांचा आग्रह कितपत मान्य करतील याबाबत शंकाच आहे. थोडक्यात एक-दोन जागा मागेपुढे करून वा मतदारसंघाची अदलाबदली करून भाजपने निश्चित केलेल्या सूत्राप्रमाणे महायुतीचे राज्यातील जागावाटप पूर्ण होईल, अशीच शक्यता आहे. भाजपने राज्यात ३० पेक्षा जास्त जागा लढविण्याची पक्की तयारी केली आहे. तसा भाजपचा ३६ मतदारसंघांत सर्व्हे झाला आहे व या जागा लढविण्याची तयारीही झाली आहे. याचाच अर्थ या मतदारसंघात शिंदे वा अजित पवार गटाला निवडणूक मैदानात उतरायचेच असेल तर त्यांच्या उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. यात अनायसे भाजपचाच फायदा होणार आहे, हे शिंदे व पवार या दोघांनाही चांगले कळते त्यामुळे आपापल्या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार रिंगणात उतरविण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. सर्वांत मोठी अडचण आहे ती एकनाथ शिंदे गटासमोर! सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आहेत. मात्र, हे सगळे पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे

कारण त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली आहे. शिवाय जिथे शिंदे व ठाकरे गटाच्या उमेदवारांची थेट लढत होईल तिथे शिंदेंच्या उमेदवाराला शिवसेना समर्थकांच्या असंतोषाचा थेट फटका बसू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन भाजप अशा लढती शक्यतो टाळल्या जाव्यात या रणनीतीवर भर देण्याची शक्यता आहे. अशा मतदारसंघात अदलाबदल करण्याचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. अदलाबदलीपोटी जे मतदारसंघ भाजप शिंदे वा पवार गटाला देईल तिथे उमेदवारास भाजपच्या चिन्हावर लढण्याची अट घातली जाऊ शकते. अजित पवार गटाकडे सध्या एकच खासदार आहे. मात्र, या गटाची शिंदेंच्या सेनेला मिळतील तेवढ्या जागा आपल्यालाही मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. अर्थात भाजप ही अपेक्षा पूर्ण करण्याची अजिबात शक्यता नाहीच. मात्र, या जोरबैठकांतून विधानसभा निवडणुकीसाठी जास्त जागांचे आश्वासन भाजपकडून पदरात पाडून घेण्याची अजित पवार गटाची रणनीती दिसते आहे. त्यामुळे लोकसभा जागावाटपात पवार गटाने ज्या जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत तेवढ्या पदरात पडल्या तरी अजित पवार गट त्या फारशी खळखळ न करता स्वीकारेल. मात्र, खरी डोकेदुखी एकनाथ शिंदे यांना सहन करावी लागणार आहे. आपल्यावर विश्वास टाकून आलेल्यांची समजूत कशी काढायची? हा शिंदेंसमोरचा यक्ष प्रश्न आहे.

अमित शहा यांच्यासमोर त्यांनी ही चिंता बोलून दाखविल्याचीही माहिती आहे. शिंदेंच्या या चिंतेवर भाजप आता काय उपाय काढणार, हे ९ मार्चच्या बैठकीत कळेल. कदाचित शिंदेंच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर उतरविण्याचा उपाय शोधला जाण्याची शक्यता त्यामुळेच सर्वांत जास्त आहे. तूर्त भाजप मित्रपक्षांना १६ ते १८ जागांपेक्षा जास्त जागा सोडणार नाही हे सुस्पष्ट आहे. त्यामुळे या १६ ते १८ जागांच्या वाटणीवरूनच महायुतीत पवार व शिंदे गटाच्या जोरबैठकांचे सत्र रंगणार आहे. त्यामानाने महाआघाडीतील जागावाटप सोपे मानावे लागेल कारण भाजपला रोखण्याच्या समान उद्दिष्टामुळे उद्धव ठाकरे व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यागाची तयारी ठेवली आहे. महाआघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित आहे. त्यात अडथळा आहे तो प्रकाश आंबेडकरांचे समाधान करण्याचा! आंबेडकर यांनी बुधवारच्या बैठकीत पाच जागांची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, आंबेडकरांच्या या फॉर्म्युल्यावर बुधवारी एकमत होऊ शकले नाही. आंबेडकरांना सोबत घ्यायचेच यावर महाआघाडीतील पवार व ठाकरे गट आग्रही आहेत. मात्र, त्यांना आपल्या वाट्याच्या जागा कोण सोडणार, हा तिढा आहे. महाआघाडीत उद्धव ठाकरे गट २२, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी १० जागा लढविणार आहे.

आंबेडकरांचे समाधान करायचे तर तीनही पक्षांना आपल्या कोट्यातून जागा सोडण्याची तयारी ठेवावी लागेल. ठाकरे गटाने १ जागा सोडण्याची तयारी केली आहे पण इतर जागा कोण सोडणार हे निश्चित होत नाही. त्यामुळे महाआघाडीतही जोरबैठका होणार आहेत. अर्थात प्रकाश आंबेडकर महाआघाडीसोबत नाही आल्यास काय, याची चाचपणीही महाआघाडीतील तीन प्रमुख पक्षांनी सुरू केलेलीच आहे. मात्र, आंबेडकरांचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न महाआघाडी करणार कारण आंबेडकर स्वतंत्र लढले तर १२ ते १६ मतदारसंघांत महाआघाडीला मतविभाजनाचा फटका बसू शकतो. मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला त्याचा अनुभव आलेलाच आहे. त्यामुळे विलंब झाला तरी आंबेडकरांचे समाधान करण्याचा महाआघाडीतील नेते पूर्ण प्रयत्न करतील. अर्थात सध्याची आंबेडकरांची भूमिका पाहता सन्मान्य तोडगा काढण्यासाठी महाआघाडीलाही जोरबैठका काढाव्या लागणार असल्याचीच चिन्हे आहेत. एकंदर राज्यातला राजकीय गुंता हा सर्वच राजकीय पक्षांसाठी अडचणीचाच ठरतो आहे. याचा प्रत्यय जागावाटपासाठी सध्या सुरू असलेल्या जोरबैठकांच्या सूत्रावरून येतो आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR