35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरबागल गटाचा भाजप प्रवेश करण्याचा निर्णय

बागल गटाचा भाजप प्रवेश करण्याचा निर्णय

सोलापूर : करमाळा तालुक्यात आतापर्यंत शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बागल गटाचा भाजप प्रवेश होणार आहे.

दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी कोलतै-बागल वा पुत्र दिग्विजय बागल हे करमाळा तालुक्यात बागल गटाचे अस्तित्व टिकवून आहेत. या गटाच्या बैठकीत करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तसेच अनेक वर्षे रखडालेली रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे दिग्विजय बागल यांचे म्हणणे आहे.

या बैठकीस दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्यासह या गटाचे मार्गदर्शक विलास घुमरे आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर तसेच या गटाचे समर्थक उपस्थित होते. दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल यांचा राजकीय प्रवास ३५ वर्षांपूरूवी मोहिते-पाटील गटाच्या माध्यमातून झाला. १९९५ साली करमाळा विधानसभा निवडणुकीत बागल हे मोहिते-पाटील समर्थक म्हणूनच अपक्ष आमदार झाले होते. त्यानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती. नंतर ते काँग्रेसमध्ये आले होते. दिगंबर बागल यांच्या निधनानंतर बागल गट पुन्हा राष्ट्रवादीत परतला होता. त्यांच्या पत्नी शामल बागल यांना राष्ट्रवादीने आमदार केले होते. परंतु तालुक्यातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन २०१९ साली रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळूनही रश्मी बागल यांना पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतर बागल गट पक्षीय राजकारणात फारसा सक्रिय नव्हता. मात्र अलिकडे राज्यात राजकीय नाट्य घडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बागल गटाने एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पत्करले होते. त्यावेळी बंद पडलेला आदिनाथ साखर कारखाना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे करमाळ्यात आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभासाठी यावे लागले होते. परंतु नंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षांतार्गत गटबाजीमुळे बागल गटाच्या हातात काहीही पडले नाही. या पार्श्वभूमीवर आता पुढील भवितव्याचा विचार करून या गटाने भाजपची वाट धरली आहे. त्यासाठी भाजपचे संघ वर्तुळातील आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR