ढाका : बांगला देशचा कर्णधार शाकिब अल हसन नव्या खेळीची सुरुवात करत असून त्याने राजकारणात पाऊल ठेवले आहे. आयसीसी ‘वन डे’ विश्वचषक २०२३ मध्ये वादग्रस्त अपीलमुळे चर्चेत राहिलेला शाकिब आता लोकसभेची निवडणूक लढणार आहे.
तो त्याच्या जिल्ह्यातील मागुरा -१ या मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. ७ जानेवारीपासून होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी बांगला देश अवामी लीगकडून शाकिब निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.
शाकिबच्या आधी मशरफे मुर्तजा याने निवडणूक लढवली आहे. तो खासदार असताना देखील क्रिकेट खेळला आहे. निवडणूक लढण्यापूर्वी शाकिब बांगला देश संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे कळते. शाकिब अल हसन नवीन खेळी करणार असल्याची माहिती त्याने काही दिवसांपूर्वीच दिली होती. शाकिब त्याच्या जिल्ह्यातील दक्षिण-पश्चिम गृह जिल्हा मागुरा किंवा राजधानी ढाका येथील जागेवरून निवडणूक लढवू शकतो, असे बांगला देश अवामी लीगचे संयुक्त सरचिटणीस नसीम यांनी सांगितले होते.