30.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeपरभणीभक्तोत्सव अ.भा. कला महोत्सव दिमाखात संपन्न

भक्तोत्सव अ.भा. कला महोत्सव दिमाखात संपन्न

परभणी : ज्ञानेश धृपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था परभणीच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन व वै. तालमणी पं.भक्तराज ज्ञानोबा भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त आयोजित भक्तोत्सव अ.भा. कला महोत्सव परभणी येथील श्री कृष्णा गार्डन येथे दिमाखात पार पडला.

या महोत्सवात दि. २६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय वारकरी भजन स्पर्धा पार पडल्या. त्यात आत्मानंद संगीत विद्यालय, परभणी व त्रिधारा भजनी मंडळ, परभणी यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना आयोजकांद्वारा विभागून रूपये ११ हजार रोख रक्कम व सन्मानचिन्ह पारितोषिक देण्यात आले. तसेच ज्ञानदीप भजनी मंडळ परभणी व पलसिद्ध महिला भजनी मंडळ गंगाखेड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना विभागून रूपये ७००० रोख पारितोषिक देण्यात आले व श्री राम भजनी मंडळ उदगीर यांना आयोजकांद्वारा रूपये ३००० रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेस परिक्षक म्हणून प्रा. व्यंकटेश जी परांडे व प्रा. संदीप जी देशमुख (मुंबई) लाभले होते. सायं. ७ ते १० या वेळेत स्थानिक कलावंतांचे विविध कला सादरीकरण झाले. या सत्राचे उद्घाटन डॉ. केदार खटींग यांच्या हस्ते झाले.

२७ जानेवारी रोजी अ.भा. शास्त्रीय मृदंग सोलो वादन स्पर्धा पार पडल्या. त्यात स्वप्निल सुर्यवंशी (पुणे) व गणेश कदम यांनी प्रथम तर गणेश राजगुरे व युवराज क्षीरसागर यांनी द्वितीय आणि ज्ञानेश्वर अंडील व कृष्णा साळुंके यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ११०००, ७००० व ३००० अशी पारितोषिके विभागून श्री विठ्ठल डेव्हलपर्स पुणे (श्री. नंदकिशोर डोंबे) यांच्या तर्फे रोख स्वरुपात देण्यात आली. या स्पर्धेकरिता अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे अध्यक्ष बालासाहेब सुर्यवंशी व तालमणी नामदेव केंद्रे परिक्षक म्हणून लाभले होते.

सायंकाळी बक्षीस वितरण, महोत्सव उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यात मृदंग वादन स्पर्धेचे विजेते स्वप्निल सुर्यवंशी यांना पहिला मृदंग भक्तराज युवा पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्षपद ह.भ.प. तुकाराम म. गरुड दैठणकर यांनी भुषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. राहुल पाटील, माजी खा. तुकारामजी रेंगे पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष जावळे, डॉ. रामेश्वर नाईक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR