पुणे : मागील काही दिवसांपासून नामदेव जाधव हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सतत टीका करत आहे. नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पवारांवर सततचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या चेहऱ्याला काळे फासले आहे. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माध्यमांशी बोलत असतानाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले. पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
केवळ प्रसिद्धीसाठी किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन कोणत्याही पुराव्याशिवाय सतत पवारांवर टीका करत असल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधवांवर आरोप केला आहे. लोकांना आम्ही नामदेव जाधवच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की यापुढे कोणीही शरद पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याही तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.नामदेव जाधव करत असलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे उघड करावेत अन्यथा पवार जाहीर माफी मागावी असा ईशारा आम्ही नामदेव जाधवला दिला होता. अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी पूर्वसूचनाही दिली होती. असं असतानाही नामदेव जाधवने पुरावे सादर केले नाहीत, पवारांची माफीही मागितली नाही, असेदेखील आरोपी त्यांनी केले नाही.