चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार आल्यानंतर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा तामिळनाडू सरकार राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आणण्याचा विचार करत आहे. या योजनेनुसार, मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी दिली जाऊ शकते.
शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला आहे. राजमोहन यांनी मांडलेल्या या प्रस्तावावप अद्यापही कोणता निर्णय घेतला नसून त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तामिळनाडू सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यास विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या मेनूमध्ये मोठा बदल होऊन त्यांना आठवड्याला एक दिवस बिर्यानीचा आस्वाद घेता येईल. या प्रस्तावावर बोलताना मंत्री राजमोहन म्हणाले की, तामिळनाडूतील प्रत्येक सरकारने त्यांच्या काळात विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात सुधारणा केली आहे.
कामराज यांनी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली, करुणानिधी यांनी त्यात अंड्याचा समावेश केला. एम.जी.आर. यांनी त्याचे रूपांतर पौष्टिक आहार योजनेत केले आणि जयललिता यांनी संपूर्ण आठवडाभर अंडी देण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे मला देखील विद्यार्थ्यांच्या आहारत थोडा बदल करायचा असून शाळांमध्ये आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी सुरू करण्याची इच्छा राजमोहन यांनी व्यक्त केली. तामिळनाडू हे शालेय पोषण कार्यक्रमांमध्ये नेहमीच देशात आघाडीवर राहिले आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर, मुलांचे पोषण सुधारण्यासाठी आणि शाळेत उपस्थिती वाढवण्यासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल.
















