नागपूर : गुजरातचे ड्रग महाराष्ट्रात आणण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. राज्य सरकार राज्याला ड्रग्जच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे. ललित पाटीलच्या माध्यमातून यापूर्वी पुढे आले आहे. मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात ड्रग्ज येत असून यात राज्य सरकारचे त्यावर नियंत्रण नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते. महाराष्ट्रात ड्रग गुजरातमधून येत असताना सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रगचे समूळ नष्ट करू असे जाहीर केले असले तरी गुजरातवरून ड्रगचा पुरवठा कसा होतो याची चौकशी केली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
मराठवाड्यात कुणबी मोठ्या प्रमाणात आहेत मात्र त्यांना फायदे मिळत नाहीत. शिंदे समितीला नोंदी आढळल्या असून त्यात मराठा हा शब्द आढळतो, जनगणना महत्त्वाची गोष्ट आहे, केंद्र सरकारने जनगणना थांबवून ठेवली आहे, ५० टक्क्यांची मर्यादा काढल्याशिवाय आरक्षण देण्यात अडचण येईल, असेही पटोले म्हणाले.
अजित पवार यांच्या आईला मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. त्यात काहीच चूक नाही. मात्र महायुतीमध्ये अजित पवार यांना संधी मिळेल, असे वाटत नाही, असेही पटोले म्हणाले.
छत्तीसगढमध्ये भाजपाने जाहीरनामा काढला. गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याचे सांगितले, पंतप्रधान हे देशाचे आहेत मग देशभरातील जनतेला द्यायला पाहिजे. धानाला आधारभूत किंमत वाढवण्याचे सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री नसून देशाचे पंतप्रधान सांगत आहेत, असेही पटोले म्हणाले. महागाई कितीही केली तरी लपवता येत नाही.
भाजपा प्रदेशाध्यक्ष राज्यात फिरत आहेत तेव्हा याचा अनुभव त्यांनाही आला आहे. पंतप्रधान सांगतात की, देशात गरिबी नाही, मग ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा का केली, त्यातही रेशनमध्ये सर्वच धान्य मिळत नाही, हा जुमला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.