35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयभाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी; राहुल गांधींचा संताप

भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी; राहुल गांधींचा संताप

सुरत : गुजरातमधील सूरत येथील भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले असून, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. पण, काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली, मात्र अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत. यावरून राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत तीव्र प्रतिक्रिया दिली.

सोशल मीडियावर एक पोस्ट करत राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, हुकुमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. आपला नेता निवडण्याचा जनतेचा अधिकार काढून घेणे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ही केवळ सरकार बनवणारी निवडणूक नाही तर देश वाचवण्याची निवडणूक आहे. संविधानाच्या रक्षणाची ही निवडणूक आहे.

तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली जाईल. सूरत येथील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. दरम्यान, बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. सूरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. आता गुजरातच्या २५ जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR