नागपूर : प्रतिनिधी
पूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा होती की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे रसद पुरवत आहेत. मात्र, हा आरोप कोणी केला असेल, तर तो भाजपवाल्यांनीच केला होता. त्यांना ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चाही भाजपनेच घडवून आणली होती,असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
विजयादशमीच्या कार्यक्रमात प्यारे खान यांना का बोलावले? असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले, आतापर्यंत महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचा एकही मंत्री ठेवण्यात आला नाही. अशा स्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या मोर्च्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय उत्तर देणार, याकडे आमचे लक्ष लागून आहे. जे लोक स्वत: लोकशाही संपवत आहेत, तेच आज लोकशाहीवर शिकवणी देत असतील, तर याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणावे लागेल, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. सध्याच्या कारभारावर जनता नाराज असून, याच पद्धतीमुळे जनता आता रस्त्यावर उतरत असल्याचेही ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेतील लोक एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी असे आरोप करत असून, त्यातून एकमेकांच्या विरोधात वातावरण तयार केले जात आहे. जरांगे पाटील यांच्याविरोधात जे-जे लोक बोलले आहेत, त्यांनी पुढे येऊन आपले पुरावे सिद्ध करावेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना, अभिजित वंजारी हे प्रचंड मतांनी विजयी होणार असून त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अन्न-नागरी पुरवठा विभागात मोठा घोटाळा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अन्न-नागरी पुरवठा विभागाच्या कारभारात प्रचंड मोठा घोळ असून इथे मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर अनेक जण थेट तुरुंगात जातील.
















