पुणे : प्रतिनिधी
डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कृती करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शहरात डेंग्यूचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याचा दावा करीत काँग्रेसने महापालिकेला ४८ तासांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्रभावी उपाययोजना सुरू न झाल्यास महापालिका भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरात डेंग्यूच्या दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान रुग्णसंख्येत वाढ झाल्याचा दावा करीत केवळ सप्टेंबर महिन्यात ६०० हून अधिक रुग्ण आढळल्याचे पक्षाने निदर्शनास आणून दिले. कोथरूड आणि औंध-बाणेर परिसरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे.
शहरातील विविध भागांत साचलेले पाणी, कच-याचे ढीग, तुंबलेली गटारे आणि अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. महापालिकेकडून करण्यात येणारी धूरफवारणी आणि डासनाशक औषधांची फवारणी पुरेशी प्रभावी नसल्याने डेंग्यूचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याची टीकाही काँग्रेसने केली. डेंग्यू नियंत्रणासाठी केवळ बैठका, आश्वासने आणि जनजागृतीवर भर न देता प्रत्यक्ष कामातून नागरिकांना दिलासा द्यावा, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई करावी
डेंग्यू नियंत्रणासाठी केवळ बैठका आणि आश्वासनांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात स्वच्छता, फवारणी आणि उपचारांची व्यवस्था तातडीने सुधारावी. प्रशासनाने पुढील ४८ तासांत ठोस कार्यवाही सुरू न केल्यास पुणेकरांच्या आरोग्याच्या प्रश्नावर महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
















