मुंबई : प्रतिनिधी
अंधेरी पूर्व येथील साकीनाका, खैराणी रोडवरील एका व्यावसायिक व निवासी संकुलाला मंगळवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग आटोक्यात आणली.
खैराणी रोडवरील अब्दू रशीद कंपाऊंडमधील तळमजला अधिक एक मजली गाळे व चाळींमध्ये मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आग भडकली. सुरुवातीला काही दुकानांपुरती मर्यादित असलेली ही आग बघता-बघता सुमारे ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि घरांमध्ये पसरली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ६.३७ वाजता ‘लेव्हल-२’ आग जाहीर केली.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर तयार गार्मेंट, प्लॅस्टिक दाणे, भंगार, लाकडी फर्निचर, रिकामे अॅरोसॉल कंटेनर्स आणि एलपीजी सिलिंडरचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. तसेच रस्त्यावर उभी असलेली दोन दुचाकी वाहने आणि एक टेम्पोही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आठ फायर इंजिन, सहा जंबो टँकर्स आणि इतर विशेष उपकरणांच्या मदतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
















