30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरभाजपाचे फक्त बोलाचा भात-बोलाची कढी

भाजपाचे फक्त बोलाचा भात-बोलाची कढी

सुधाकर शृंगारे लातूर-नांदेड रेल्वे प्रश्न सोडविण्यास ठरले असमर्थ

रविकांत क्षेत्रपाळे : अहमदपूर
गेल्या दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भाजपाची एकहाती सत्ता असून लातूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या खासदारांना मतदारांनी मोठ्या हौसेने, विकास कामे करतील या उद्देशाने व अपेक्षेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. गेल्या दहा वर्षांपासून लातूर रोड ते अहमदपूर-लोहा-नांदेड हा रेल्वे प्रश्न अद्यापही सोडविण्यात आलेला नाही. याबरोबरच मतदारांना दिलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचा कोपराला लावलेला गूळ कधी काढणार, असाही प्रश्न आता मतदार विचारताना ऐकावयास मिळत आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या गोड व खोटे बोलण्याला अजिबात न फसता यावेळी महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजीराव काळगे या अभ्यासू, हुशार उमेदवाराच्या पाठीशी मतदार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शासनाने लोंबकळत ठेवल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. मराठा समाजातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्यामुळे निराश झाले आहेत. अनेक जण आत्महत्या करीत असूनही सरकारने आरक्षणाचा प्रश्न हा चक्क झुलवीत ठेवला आहे. यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये भाजपा सरकारविषयी तीव्र असंतोष पसरलेला आहे. शेतक-यांच्या मालाला भाजपाने जीएसटी लावली व सर्व महागाई वाढवून ठेवली असून शेतक-यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे.

सोयाबीन पेंड, डीओसी, सोयातेल आयात केले आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारने खाद्यतेलावर एक लाख कोटी २३ हजार रुपयांचे, खाद्यतेल आणि कडधान्य आयातीवर ३१ हजार कोटी रुपये खर्च केलेला आहे. दुष्काळ आणि शेतीमालाचे पडलेले भाव प्रचंड महागाईने होरपळलेल्या आणि गर्तेत अडकलेल्या देशातील शेतक-यांना वा-यावर सोडून सरकारने आयात करून परदेशातील शेतक-यांची चांदी केली आहे. भाजपा सरकारने शेतक-यांना चक्क वा-यावर सोडल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे.

गेल्या दहा वर्षांपासून लातूर जिल्ह्याचा लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड हा रेल्वेचा प्रश्न खासदार सोडवितो म्हणाले. मागच्या व यावेळी रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे असूनही भाजपा खासदारांना महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही. आपल्या अडचणीचे प्रश्न व्यवस्थित मांडता येणे रेल्वेचे काम जनतेच्या, व्यापा-यांच्या, शेतक-यांच्या, कामगारांच्या, कष्टक-यांच्या जीवनाशी निगडित व महत्त्वाचे असल्याचे पटवून देऊन प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. विकासाच्या योजना आणून मतदारांचा, कामगारांचा, सुशिक्षित बेरोजगारांची, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी आदींची उन्नती, प्रगती करणे आवश्यक आहे. पण असे झाल्याचे मतदारसंघात कुठेही पहावयास मिळत नाही.

मोदी सरकारने सर्वांसाठी ‘अच्छे दिन’ येणार, प्रत्येकाच्या खात्यावर बँकेमध्ये १५ लाख रुपये जमा होणार म्हणून सांगितले. नोटाबंदी केली पण अद्यापही कोणाच्या खात्यावर रुपये जमा झालेले नाहीत. पंतप्रधान मोदी खोटे पण रेटून बोलत आहेत, असेच आता सर्वांना वाटते आहे. सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे, गॅसचे भाव वाढले, सबसिडी बंद झाली, माणसांना लागणा-या औषधांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, पेट्रोल-डिझेल, खताचे भाव, शेतीसाठी लागणा-या औषधांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी नाही, शेतक-यांना पीक विमा दिला जात नाही, भाजपाची नेतेमंडळी जोमात तर मतदार मात्र कोमात गेला आहे. भाजपा नेते यांच्या फसव्या, भूलभुलय्या, थापा मारणे, दिशाभूल करणे, खोटे बोलणे यामुळे मतदारांमध्ये खूपच नाराजी पहावयास मिळत असून मागे मतदानाच्या वेळी केलेल्या चुकीमुळे खूप त्रास सहन करावा लागला, यावेळी मात्र अजिबात कसलीही चूक न करता महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या पाठीशी स्वत:हून, खंबीरपणे उभे राहताना मतदार दिसून येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR