नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या नेतृत्वाखाली सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या. पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले, तर आंदोलकांनीही दगडफेक केली. दोन्ही बाजूंचे अनेक लोक जखमी झाले.
अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी या घडामोडीला प्रमुखतेने कव्हर केले आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अहवालात लिहिले आहे की, शिक्षण व्यवस्था आणि भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांवरून आंदोलन करणारे हजारो तरुण पोलिसांच्या कारवाईनंतरही मागे हटले नाहीत. वृत्तपत्रानुसार, संसद मार्चदरम्यान झालेल्या चकमकी आणि पोलीस कारवाईच्या दुस-याच दिवशी मोठ्या संख्येने आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर पोहोचले आणि सरकारकडून जबाबदारीची मागणी करत ठाम राहिले. अहवालानुसार, आंदोलक शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित मुद्यांवर सरकारकडून उत्तर मागत आहेत. वृत्तपत्राने लिहिले आहे की, संसदेकडे मार्च करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचे गोळे सोडले. आंदोलकांचा आरोप आहे की, त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.
आंदोलनाचे नेतृत्व करणा-या गटांनुसार, सोमवारी झालेल्या संघर्षात १५० आंदोलक जखमी झाले. तर, दिल्ली पोलिसांनी ११८ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे आणि सुमारे ७० आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
आंदोलकांची माघार नाही : द गार्डियन
ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने आपल्या अहवालात लिहिले की, दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेले युवा आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतरही थांबताना दिसत नाहीे. वृत्तपत्रानुसार, सोमवारी झालेल्या संघर्षाच्या दुस-या दिवशीही हजारो आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून होते आणि आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. अहवालात म्हटले आहे की, सोमवारी ५० हजारांहून अधिक लोक निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आंदोलक जंतर-मंतरवरून संसदेकडे कूच करत होते, परंतु पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. वृत्तपत्रानुसार, यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आली, इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आणि नंतर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले तसेच लाठीचार्ज केला.
मुलांवरही बळाचा वापर
द गार्डियनने आंदोलनकर्ते आणि प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने लिहिले की, पोलिसांनी महिला आणि मुलांवरही बळाचा वापर केला. अहवालात दावा करण्यात आला की, सुमारे ६० लोक जखमी झाले, तर एका आंदोलनकर्त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले. वृत्तपत्राने आपल्या अहवालात लिहिले की, हे आंदोलन शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीपलीकडे जाऊन मोठ्या संख्येने तरुणांच्या असंतोषाची अभिव्यक्ती बनताना दिसत आहे. तर, पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली.
दुस-या दिवशी विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर : अल जझीरा
अल जझीराने लिहिले की संसद मार्चदरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतरही विद्यार्थी माघार घेण्यास तयार नाहीत. अहवालानुसार, लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्यानंतर दुस-याच दिवशी मोठ्या संख्येने आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर परतले आणि आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली. अहवालात म्हटले आहे की, संसदेकडे जाणा-या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. या कारवाईत १०० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. अल जझीराने घटनास्थळी तुटलेले बॅरिकेड्स, विखुरलेले सामान आणि संघर्षाच्या खुणांचाही उल्लेख केला आहे.
युवकांमध्ये प्रचंड नाराजी
अहवालानुसार, प्रवेश परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी आणि मूल्यमापनातील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे युवकांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नाराजी आहे. वृत्तपत्राने असेही लिहिले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत आंदोलनावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. तर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलकांच्या समर्थनार्थ आवाज उठवला. विश्लेषकांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की या आंदोलनाने सरकारची जबाबदारी आणि लोकशाही संस्थांबाबत चर्चा तीव्र केली आहे.
















