मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली जयंती याचे औचित्य साधत राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र ५३३ शेतक-यांची पहिली प्रातिनिधीक यादी जाहीर केली. मंत्रालयात आयोजित सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. राज्यातील ५६ लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतक-यांनाही २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

आजपर्यंतची सगळयात मोठी अशी ही ऐतिहासिक कर्जमाफी योजना असणार असल्याचे बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्जमाफी योजनेसाठी ४० हजार ९८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानंतर नुकत्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही योजना आणखीन विस्तारित करण्यात आली.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतक-यांचाही समावेश यात करण्यात आला. आता बुधवारी अधिकृतरित्या प्रातिनिधीक स्वरूपात सात जिल्ह्यातील निवडक ५३३ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली. लाभार्थी शेतक-यांची यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक करण्यात आली आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतक-यांवरील आर्थिक ताण कमी करुन त्यांना नव्या जोमाने शेती करता यावी यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यापूर्वी कर्जमाफी झाल्यास शेतक-याला कर्ज मिळत नव्हते.

आता कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतक-यांना कर्ज दिले पाहिजे अशी कायदेशीर तरतूद करण्यात आली असल्याचेही बाबासाहेब पाटील म्हणाले. शेतीबाहय उत्पन्नावर आयकर भरणा-या शेतक-यांना याचा लाभ मिळणार नाही. त्याबाबत केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून त्यासाठी खास अधिकारीही नेमण्यात आला आहे. ही आकडेवारी आल्यानंतर एकदोन दिवसांत संपूर्ण यादी प्रसिदध करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. यादी प्रसिदध झाल्यानंतर काही आक्षेप असल्यास जिल्हास्तरावरील समितीकडे अपील करता येईल. तिथे समाधान न झाल्यास राज्य स्तरावर त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. २ लाखापेक्षा ज्या शेतक-यांची रक्कम जास्त आहे. त्यांना वरची रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत भरावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना २ लाखापर्यंतच्या रकमेचा लाभ मिळणार आहे.

कशी होणार प्रक्रिया?
यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर आधार प्रमाणिकरण करण्याबाबत एसएमएस पाठविण्यात येणार आहे. तसेच सदरच्या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर यादीमध्ये पात्र शेतक-यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. शेतक-यांना त्याचे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे ३२ हजार आपले सरकार सेवा केंद्रातून पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याप्रमाणे आधार प्रमाणिकरण करणेपूर्वी शेतक-यांची अ‍ॅग्रीस्टॅक वरील नोंदणी आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम डीबीटीव्दारे हस्तांतरित करण्यात येणार आहे.