26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयब्रिजभूषण यांचा पत्ता कट; मुलाला तिकीट

ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; मुलाला तिकीट

कैसरगंज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी उमेदवारांची १७ वी यादी जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेशातील बहुप्रतिक्षित रायबरेली आणि कैसरगंजच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहेत. भाजपने वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र करणभूषण यांना कैसरगंज मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तर, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून कैसरगंज मतदारसंघ भाजपसाठी डोकेदुखी ठरला होता. येथील विद्यमान खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर देशातील काही महिला कुस्तीपटूंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना परत उमेदवारी देणे भाजपवर उलटले असते. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाणार, हे जवळपास निश्चित होते. आज अखेर ब्रिजभूषण यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले.

विशेष म्हणजे रायबरेली हादेखील भाजपसाठी तितकाच महत्वाचा मतदारसंघ आहे. याचे कारण म्हणजे, हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे गेल्या अनेक दशकांपासून गांधी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसने अद्याप या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केला नाही, पण प्रियंका गांधी यांना तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत एक ताकदीचा उमेदवार देणे भाजपसाठी गरजेचे होते. आज अखेर रायबरेलीतून दिनेश सिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

कोण आहेत करणभूषण सिंह?
१३ डिसेंबर १९९० रोजी जन्मलेला करणभूषण सिंह डबल ट्रॅप नेमबाजीचे राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत. त्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून बीबीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले, त्यानंतर ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमाही केला. सध्या ते उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे.

२० मे रोजी होणार मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी कैसरगंज लोकसभा जागेवर मतदान होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ही जागा जिंकली होती. त्यांना ५,८१,३५८ मते मिळाली. बसपाचे चंद्रदेव राम यादव यांना ३,१९,७५७ तर काँग्रेसचे उमेदवार विनयकुमार पांडे यांना ३,७१३२ मते मिळाली. २०१९ मध्ये सपा-बसपा एकत्र निवडणूक लढले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR