34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeधाराशिवउमरग्यात मतदारांची ‘नोटा’ला पसंती?

उमरग्यात मतदारांची ‘नोटा’ला पसंती?

 उमरगा : अमोल पाटील
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार निवडीसाठी तालुक्यात प्रचार सभांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सोबत आश्वासनांची खैरात वाटली जात आहेच. पण तालुक्यातील घराणेशाहीचा तिटकारा आलेला मतदार, ठोस आणि प्रत्यक्ष विकासाच्या मुद्याला दिलेली तिलांजली, निष्ठा-विचारांशी गद्दारी हेच जिल्ह्याच्या विकासाचे योगदान व मोजमाप झाल्याने महागाई, बेरोजगारीसह दुष्काळाच्या झळा सोसत असलेली लोकशाही निवडणुकीच्या कळा घेऊन सुदृढ विकासाला जन्म देईल असे अनेक सुजाण मतदारांना वाटत नाही. त्यामुळे घटनेने व निवडणूक आयोगाने मतदारांना दिलेल्या ‘नन ऑफ दी अबाहू ’ या पर्यायाला मोठी पसंती मिळून ‘नोटा’चा टक्का तालुक्यात वाढण्याची चर्चा मतदारांमधून होत आहे.

तालुक्यातून सुशिक्षित बेरोजगारांचे थवेच्या थवे पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरात स्थलांतरित होत आहेत. औद्योगिक वसाहतीतील येणा-या उद्योगांचा प्रवाह पाहता पुढील पंधरा-वीस वर्षे तरी स्थानिक तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे वाटत नाही. खासदारकीचा जोगवा मागणा-यांना याचा साक्षात्कार कधी होईल हाही एक प्रश्नच आहे. उमरगा-लोहारा तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे मागील आठ वर्षांपासून संथ गतीने चालू असलेले निकृष्ट दर्जाचे काम हजारो कुटुंबे उद्ध्वस्त करणारा मृत्यूचा सापळाच ठरला आहे. मराठा-ओबीसी आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न यामुळे मतदानात होणारा तोटा ‘नोटा’च्या पथ्यावर पडणार आहे.

जिल्ह्यापासून सर्वांत दूर असलेला तालुका म्हणून उमरगा तालुक्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यापासून तालुका जितका दूर तितकाच निवडून येणा-या खासदाराचा विकास निधीही दूरच असतो. तसा फार पूर्वीपासूनच उमरगा तालुक्याचा जिल्ह्यावर राजकीय दबदबा आहे. अनेक प्रभावशाली पक्षातील मातब्बर व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा दावा केला होता.

उमरगा तालुक्याचा खासदार होणार असेच काही चित्र स्पष्ट झाले होते. अचानक राजकीय गणिते बदलल्याने उमेदवारी धाराशिवला गेली. यात तालुक्यातील लोकसभेच्या उमेदवारीची आशा लावून बसलेला निराश झालेला सर्वपक्षीय कार्यकर्ता उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे सावली धरून आहे तर पहिल्या व दुस-या फळीतील नेते-पदाधिकारी वातानुकूलित कक्षातून बाहेर पडताना दिसत नाहीत. त्यात ‘प्रचार यंत्रणा’ दुस-या फळीतील पदाधिका-यांपर्यंतच अडकल्याने कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह पाहायला मिळत नाही.

उमेदवारांच्या चिन्हाबाबत संभ्रम
अनेक पक्षांमध्ये पडलेली फूट आणि चिन्हांची वाढलेली संख्या पाहता चिन्हाबाबत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होतो न होतो तोच उमेदवारांना मिळालेले चिन्ह महाविकास आघाडी व महायुतीच्या विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना रुचताना दिसत नाही. कमळ, हात, घड्याळ, मशाल, तुतारी, बाण, इंजिन या चिन्हांच्या रेलचेलीत प्रत्येक पक्षाचा मतदार वेगळा आहे. नेमका आपल्या उमेदवाराचे चिन्ह कोणते हे सामान्य मतदारापर्यंत अद्याप पोहोचलेले नाही. मतदार मतदान केंद्रात आल्यानंतर चिन्हाबाबत संभ्रमात पडण्याची दाट शक्यता आहे. याचाही फायदा ‘नोटा’च्या बटनाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR