27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरखर्डी येथे घरफोडी; सहा लाखांचा मुद्देमाल चोरी

खर्डी येथे घरफोडी; सहा लाखांचा मुद्देमाल चोरी

पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथील माजी सरपंच भगवान विठोबा रोंगे यांच्या घरी रात्री घरफोडी झाली आहे. रात्री ११ वाजता उकाड्याचे दिवस असल्याने भगवान विठोबा रोंगे व शकुंतला भगवान रोंगे हे पती-पत्नी जेवण करुन अंगणात झोपले होते. चोरट्यांनी याचा फायदा घेऊन घराचे कुलूप उघडून दोन लाख रुपये किंमतीचे सोने व रोख चार लाख रुपये, असा एकूण सहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. यामुळे खर्डी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरामध्ये पती-पत्नी दोघेच राहतात. भगवान रोंगे व त्यांची पत्नी हे रात्री घराबाहेर झोपले होते. सकाळी उठल्यानंतर त्यांना घराचे कुलूप उघडे दिसले. त्यानंतर घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट उघड्या अवस्थेत व विस्कटलेली कपडे, साहित्य दिसून आले. घरातील कपाटात उसाचे आलेले बिल दोन लाख रुपये व पुतण्या अनिल शंकर रोंगे यांनी दिलेले दोन लाख रुपये, असे रोख चार लाख रुपये व दोन लाख रुपये किमतीचे सहा तोळे सोने चोरी गेले असल्याचे दिसून आले. अंदाजे एकूण सहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

तसेच रोंगे यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या सव्वाशे यांच्या घरीदेखील चोरट्यांनी चोरी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. माजी सरपंचांच्या घरी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये भगवान विठोबा रोंगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची दिशा ठरवली आहे. डॉग स्कॉड येऊन गेले आहे तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR