27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरमहिलांनी काढला पाण्यासाठी घागर मोर्चा

महिलांनी काढला पाण्यासाठी घागर मोर्चा

श्रीपुर: बोरगाव (ता. माळशिरस) येथे सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. संतप्त महिलांनी बोरगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून त्वरित पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

सध्या कडक उन्हाळ्यामुळे पारा ४३ अंशापर्यंत पोहोचला आहे. अनेक पाण्याच्या स्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यात गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने व उजनी धरणातील पाणीटंचाईमुळे, त्याचबरोबर भाटघरच्या फाट्याला पाणी न सोडल्याने बोरगावमध्ये मार्च महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव टंचाई निर्माण झाली आहे.

बोरगावमधील सर्वच प्रभागांत विशेषता भीमनगर, साठेनगर तसेच वाड्यावस्त्यावरील नागरिकांना कामधंदा सोडून विशेषतः महिलावर्गाला पिण्याच्या वापराच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.दररोज सकाळ-संध्याकाळ काही तरुण मुले सायकलला घागरी बांधून जीथे पाणी उपलब्ध असेल तेथून पाणी आणून तहान भागवत आहे.

सध्या बोरगाव ग्रामपंचायतीचे सर्व पाण्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. त्यामुळे नळाला पाणी येणे अशक्य झाले आहे. साठेनगरमध्ये लक्ष्मण रामा साठे यांनी स्वत:च्या मालकीचे बोअर उपलब्ध करन दिल्यामुळे येथील रहिवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी नेतेमंडळी, कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासाठी प्रचाराच्या माध्यमातून जीवाचे रान करताना दिसत आहेत. मात्र, बोरगावमधील जनता मात्र पाण्यासाठी वणवण करत भटकंती करताना दिसत आहेत.

बोरगावला पाणीपुरवठा करणारी मुख्य विहीर कोरडी पडल्याने गावात पाणीटंचाई झाली आहे. याबाबत पाठपुरावा करून माळशिरस तहसीलदार, पंचायत समिती व जिलाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. कॅनॉलमधून जर पाणी मिळाले, तर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी येईल. बर्‍यापैकी जूनपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटेल. वाडयावस्त्यांवर ताबडतोब टैंकरने पाणीपुरवठा करावा. असे बोरगावचे उपसरपंच मदनसिंह पाटील म्हणाले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR