37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रदाभोलकर हत्या प्रकरणी शुक्रवारी फैसला

दाभोलकर हत्या प्रकरणी शुक्रवारी फैसला

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. या खटल्यात ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून, हत्येच्या घटनेला ११ वर्षे होत आली असून, ब-याच वर्षांनी हा खटला निकाली निघणार आहे.

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दाभोलकरांवर दुचाकीवरून आलेल्या २ हल्लेखोरांनी तीन गोळ््या झाडल्या. त्यामध्ये डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी पुणे पोलिस, नंतर राज्य दहशतवादविरोधी पथक (एसआयटी) आणि नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाचा तपास केला.

दाभोलकरांच्या हत्येला ९ वर्षे उलटल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित केले. या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश नावंदर यांच्या बदलीनंतर आता विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणात तावडे हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, अंदुरे व कळसकर यांनी गोळ््या झाडल्या तर भावे याने घटनास्थळाची रेकी केली असून, पुनाळेकर यांनी आरोपी कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, असे ‘सीबीआय’ने आरोपपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर हत्या करणे (कलम ३०२), हत्येचा कट रचणे (कलम १२० बी), अनेक व्यक्तींनी समान हेतूने केलेले कृत्य (कलम ३४), शस्त्रास्त्र कायदा आणि विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) विविध कलमांनुसार आरोप निश्चित केले आहेत.

निकालाकडे लागले लक्ष
या खटल्यात ‘सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली, तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवित सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी नोंदविली. अडीच वर्षे चाललेल्या या खटल्यात आरोपींना शिक्षा होणार की त्यांची निर्दोष मुक्तता होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR