सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कराड (जि. सातारा) येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादनासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री येतात. यंदा मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडला न येता त्यांच्या समाधीकडे पाठच फिरवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी-सकाळी अभिवादनासाठी येऊन पुणे गाठले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादनासाठी अपवाद वगळता दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री येथे येतात. ज्येष्ठ नेते चव्हाण यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अभिवादनासाठी मुख्यमंत्री शिंदे हे येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यांनी यंदा अभिवादनासाठी न येता समाधीकडे पाठ फिरवली.
दरम्यान उपमुख्यमंत्री पवार हे काल शुक्रवारी रात्रीच कराडला मुक्कामी आले. त्यांनी आज शनिवारी सकाळी सात वाजताच काही मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत समाधीस्थळ गाठले. ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सकाळी साडेसात वाजताच ते पुण्यासाठी रवाना झाले.
मुख्यमंत्री यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या हेलिकॉप्टरमधून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे कराड विमानतळावर दाखल झाले. मुख्यमंत्री न येण्याचे कारण ते आजारी असल्याचे सांगितले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा कराड दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.