30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयविज्ञान तंत्रज्ञानातील परिषदाही आता मराठीत

विज्ञान तंत्रज्ञानातील परिषदाही आता मराठीत

नवी दिल्ली : देशात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील परिषदांमध्ये आजही इंग्रजी भाषेचाच वापर होतो. त्यात सादर होणारे शोधनिबंध, चर्चासत्रे आणि कार्यशाळाही इंग्रजी माध्यमातून होत असल्याने स्थानिक भाषेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळतोच असे नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(एआयसीटीई) याची दखल घेत स्थानिक भाषांमध्ये परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांच्या आयोजनास प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी निधीही घोषित करण्यात आला.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तूरचनाशास्त्र आणि इतर तांत्रिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता अभ्यासासह शोधनिबंध स्थानिक भाषेत तयार करता येतील. एआयसीटीईने त्यांच्या संलग्न तांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘व्हायब्रंट अ‍ॅडव्होकेसी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट अँड नर्चरिंग ऑफ इंडियन लँग्वेजेस’(वाणी) योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना भारतीय भाषेतून अभ्यासासोबतच संशोधनाशी जोडणे हा या योजनेचा उद्देश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून त्यासाठी महाविद्यालयांना १० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये
– तांत्रिक महाविद्यालयांना १२ स्थानिक भाषांमध्ये १०० परिषदा किंवा परिसंवाद आयोजित करायचे आहेत.
– दोन ते तीन दिवसांच्या या कार्यशाळांसाठी मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, उर्दू, ओरिया, तेलगू, आसामी, मल्याळम, कन्नड, तमीळ, बंगाली या भाषांचा समावेश आहे.
– स्मार्ट शहरे, नील अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा, सेमीकंडक्टर, अंतराळ आणि संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर हे आयोजन करावे लागेल.
– प्रत्येक भाषेसाठी आठ परिषदा आणि १२ परिषदा हिंदीत आयोजित कराव्या लागणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR