नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरील एका अहवालानुसार, गेल्या १० महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या काही प्रक्रियांबाबत सुमारे १४ वेळा गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतच्या एका अहवालामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यानुसार, गेल्या १० महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी सुमारे १४ वेळा गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. काँग्रेसने आता या मुद्द्यावर २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या अहवालामुळे आणि आयोगातील फुटीमुळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर, विशेषत: ज्ञानेश कुमार यांच्यावर आणि सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत आहे. या संदर्भात, काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा मुद्दा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसची सर्वात शक्तिशाली समिती, सीडब्ल्यूसी ची बैठक २९ सप्टेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. असे मानले जाते की, काँग्रेस या बैठकीत ज्ञानेश कुमार यांच्याबाबत एक ठराव मांडू शकते. तथापि, त्याआधी, राहुल गांधी या मुद्यावर एक पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गांधी यांनी काल या विषयावर पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले, मतचोरी हा देशातील लोकांविरुद्धचा गुन्हा आहे. हा संविधानावरील थेट हल्ला आहे. भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोगाने देशद्रोह केला आहे. न्याय मिळेल.
दरम्यान, काँग्रेस नेते कपिल सिबल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीला दीर्घकाळापासून विरोध केला आहे. विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आले असून, याला मतचोरी म्हटले जात आहे. ज्ञानेश कुमार सरकारच्या सांगण्यावरून काम करतात, असा आरोपही ते सातत्याने करतात. त्यामुळे आता काँग्रेस हा मुद्दा लावून धरणार आहे.
फौजदारी खटला चालवा : खा. प्रियंका गांधी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयटी) प्रक्रियेत कोणतेही बेकायदेशीर प्रकार झाले असतील तर त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात, मुख्य निवडणूक आयुक्तांसह, फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केली. केरळमधील कल्पेट्टा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी एसआयआर प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न हा संविधान आणि देशाविरोधातील गंभीर अपराध असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले. जो कोणी निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेशी छेडछाड करतो, तो देशाविरोधात गंभीर कृत्य करत आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
















