35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या पराभवासाठी दिंडोरीतून माकपची माघार

भाजपच्या पराभवासाठी दिंडोरीतून माकपची माघार

दिंडोरी : देशाच्या हिताशी द्रोह करणा-या, भारताच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही संघराज्य प्रणालीला आधारभूत असलेले संविधान बदलण्याचे उद्दिष्ट राबविणा-या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उमेदवारी माघार घेत असल्याची घोषणा माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली.

दरम्यान, (ता. ६) दुपारी दोनपर्यंत याबाबतची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की माकपचे स्वतंत्र सामर्थ्य वाढविणे आणि लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करणे, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी माकपचे उमेदवार जे. पी. गावित निवडणुकीच्या मैदानात उतरले.

दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने माकप उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची रास्त अपेक्षा आणि मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते. भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्याच्या उमेदवाराविरुद्ध मतदारांत कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे.

मात्र, महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव व्हावा यासाठी माकपने दिंडोरी मतदारसंघातील गावित यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. नारकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR