मुंबई : प्रतिनिधी
गेल्या २ दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाला पोषक वातावरण आहे. तळ कोकणासह किनारपट्टी भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात चक्राकार वा-यांची स्थिती सक्रिय असल्याने ५ दिवस किनारपट्टी भागात तुफान पावसाची शक्यता आहे. पुढील २ दिवस पावसाचा जोर वाढणार असून त्यानंतर हळूहळू कमी होणार आहे. दरम्यान, मराठवाड्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला असला तरी ऐनवेळी पावसाने पाठ फिरविल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.
राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील अनेक मोठे प्रकल्प, तलाव, नदी आदी जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे तर पुढे आलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तीन ते चार तासांत नांदेड जिल्ह्यात तुरळ ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, हिंगोली व परभणी जिल्ह्यात हलक्या, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस पावसाचे
३० जून रोजी राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तळ कोकणासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसाचे हायलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात १ जुलै रोजी तळ कोकणासह उत्तर महाराष्ट्र बहुतांश मध्य महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील जिल्ह्यांना व संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पूर्व विदर्भ, मराठवाडा वगळता सरासरीइतका पाऊस
जूनमध्ये राज्यात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला. जूनची सरासरी २०८ मिमी आहे. यंदा आतापर्यंत १९४ मिमी पाऊस झाला. १५५ तालुक्यांत सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाला. ८७ तालुक्यांत सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला. ३८ तालुक्यांत सरासरीच्या २५ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली. पूर्व विदर्भ आणि मराठवाडा वगळता सरासरी एवढा पाऊस झाला आहे, असे सांगण्यात आले.